२७ नोव्हेंबर – उपकारस्मरणाचा दिवस

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार हा दिवस अमेरिकेत “थॅंक्सगिव्हिंग डे” म्हणून पाळला जातो. पुढचे शुक्रवार, शनिवार आणि रविवार त्याला जोडून चार दिवसांची सार्वजनिक सुटी देशभर दिली जाते. अमेरिकन कुटुंबे रात्रीच्या भोजनासाठी एकत्र येऊन टर्कीचा आस्वाद घेतात, लोक शॉपिंग करतात, मौजमस्ती होते, सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते. ह्या दिवसामागचा इतिहास किंवा हेतू काहीही असला तरी थॅंक्स कोणाला आणि कशासाठी द्यायचे ह्याविषयी आता कोणी काही फारसा विचार करत नाही.

पवित्र शास्त्रात स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकातील बरीचशी स्तोत्रे ही उपकारस्मरणाची स्तोत्रे आहेत. ती स्पष्ट करतात की, उपकार मानायचे ते प्रथम परमेश्वराचे. तेही फक्त आनंददायी परिस्थितीत नाही, तर विपरीत परिस्थितीतसुद्धा. कारण परमेश्वर सर्वदा आपली काळजी घेत असतो, आपला पुरवठा नियमितपणे करत असतो.

स्तोत्र १०० हे एक लहानसे पण अर्थपूर्ण स्तोत्र आहे. ते असे की,

अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा.

हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे या.

परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.

त्याचे उपकारस्मरण करीत, त्याच्या द्वारांत स्तवन करीत, त्याच्या अंगणांत प्रवेश करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा.

कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आणि त्याची सत्यता पिढ्यान् पिढ्या टिकते.

परमेश्वराचे उपकारस्मरण वर्षातल्या एका खास दिवशी करायचे आणि इतर दिवशी त्याला विसरायचे असे नाही. परमेश्वराचे उपकार विचारपूर्वक मानायचे. तोच एक देव आहे ही जाणीव मनात बाळगायची. फक्त घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण करायची असेही नाही. तर भविष्यकाळात आपल्याला परमेश्वराची दया मिळत राहील हा विश्वास बाळगून त्याचे उपकार मानायचे.

8 thoughts on “२७ नोव्हेंबर – उपकारस्मरणाचा दिवस

  1. ओम उपकार स्मरण आठवण फार चांगला दिवस आहे देव व मनुष्य व ज्यांनी ज्यांनी खर चंआयुष्य मध्ये मदत केली
    त्यांची आठवण स्मरण ठेवणे किती छान दिवस आहे, नेहमी आठवण येणे वेगळे त्या साठी वेळ देऊन बसने जेवतांना हात जोडून नमस्कार करून जेवण आठवण ठेवणे फार छान मनांना शरीर याला फार महत्व पूर्वक काम आहे
    आपण लिखाण करून आठवण मध्ये चं राहते आस काम पण फार छान आहे
    मी आभार स्मरण लिहिते
    आभार !

    Like

Leave a reply to वसुधा उत्तर रद्द करा.