१३ मार्च – एक विश्वास

विश्वास हा ख्रिस्ती विचारसरणीचा आणि धर्माचा पाया आहे. या विश्वासाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आद्य ख्रिस्ती लोकांना थोडक्यात सांगितला. त्याला प्रेषितांचा मतांगीकार असे नाव मिळाले आणि आजही तो प्रचलित आहेः

सर्वसमर्थ देव जो पिता,
आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता,
त्याच्यावर मी विश्वास ठेवतो.

आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, आमचा प्रभू ,
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरियेच्या उदरी जन्माला आला,
ज्याने पंतय पिलाताच्या वेळी दुःख भोगले,
ज्याला वधस्तंभी खिळले,
जो मरण पावला व ज्याला पुरले,
जो मृतलोकांत उतरला,
तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला,
स्वर्गात चढला आणि
सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे,
तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे,
त्याच्यावर मी विश्वास ठेवतो.

पवित्र आत्मा,
पवित्र सार्वत्रिक मंडळी,
पवित्र जनांची सहभागिता,
पापांची क्षमा,
देहाचे पुनरुत्थान आणि
सनातन जीवन,
यांच्यावर मी विश्वास ठेवतो.

आजच्या ख्रिस्ती लोकांमध्ये कॅथलिक, प्रॉटेस्टंट, बॅप्टिस्ट, लूथरन, मेथडिस्ट, वगैरे पंथ आहेत. त्यांचे वैचारिक दृष्टिकोन निराळे आहेत, त्यांच्या उपासनापद्धती निराळ्या आहेत, काही गोष्टींवर ते विशेष भर देतात. पण प्रेषितांचा मतांगीकार हा तत्वज्ञान, परंपरा किंवा ईश्वरपरिज्ञान यांच्यावर आधारलेला नाही. प्रेषितांचा मतांगीकार ऐतिहासिक सत्य आणि भविष्यातील घटनांचा भरवसा याविषयी आहे. सर्व ख्रिस्ती लोकांचा हा मूलभूत आणि सर्वसामान्य विश्वास आहे.

एक देव आणि सर्वांचा पिता, एक प्रभू, एक आत्मा, एक विश्वास, असे पवित्र शास्त्र म्हणते. (इफिस ४:४-६)

यावर आपले मत नोंदवा