१० जुलै – विशेष दिवस

दिनांक २१ जून २०१७ रोजी जगभरात, विशेषतः भारतात, आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.

त्याआधी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा झाला, ८ जून हा जागतिक महासागरांचा दिन होता, तर १७ जून हा दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा जागतिक दिन होता.

१ जून हा जागतिक मातापिता दिन म्हणून पाळला गेला, १२ जून हा बालमजुरीच्या विरोधासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन होता, १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन होता, २० जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला गेला होता, आणि २४ जून हा विधवांसाठीचा आतंरराष्ट्रीय दिन होता.

अशा प्रकारे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विद्यमाने, जून २०१७ ह्या महिन्याच्या ३० दिवसांपैकी एकूण २४ दिवस कोणत्या न कोणत्या विशेष उद्देशाने पाळले गेले. वर्षांच्या इतर ११ महिन्यांतही असे कितीतरी दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेने राखून ठेवले आहेत आणि त्यांना नावे दिली आहेत. अशा विशेष दिवसांची संख्या जर अशीच वाढत गेली तर, कालांतराने कदाचित एकाच दिवशी दोन-दोन दिवसांचे समांतर आयोजन करावे लागेल.

जगभर असे विशेष दिवस साजरे करण्यामागचा हेतू अर्थातच चांगला आहे. जागतिक समस्यांवर, समाजातील काही घटकांच्या गरजांकडे किंवा त्यांना सहन करावा लागणाऱ्या अन्यायांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा हा एक मार्ग आहे. काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना विस्मरणात जाऊ नयेत म्हणून, किंवा जगाची वाटचाल एका नव्या दिशेने व्हावी म्हणून हा एक प्रयत्न आहे. जगातील सर्व लोकांनी जगाच्या एकंदर भल्यासाठी एकत्रित होऊन कार्य करावे हा एक उदात्त उद्देश आहे.

खरे तर आपल्या आयुष्यात उजाडणारा प्रत्येक दिवस विशेष असतो, कारण तो परमेश्वराने आपल्यासाठी घडवलेला असतो. (स्तोत्र ११८:२४) प्रत्येक दिवस परमेश्वराच्या उपकारांचे पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी आणि त्याची दया व करुणा अनुभवण्यासाठी एक नवीन संधी आहे.

८ जुलै – कर देणे एक कर्तव्य

भारतीय कर प्रणालीत १ जुलै २०१७ पासून मूलभूत आणि विस्तृत बदल करण्यात आला आहे. वर्तमानपत्रातून मोठमोठ्या जाहिरातींद्वारे त्याविषयी लोकांना अवगत केले जात आहे. कर देणे आता कसे सोपे झाले आहे आणि ते कसे देशहिताचे आहे हेही समजावून सांगितले जात आहे.

पण पवित्र शास्त्रात वाचायला मिळते की, दोन हजार वर्षांपूर्वीदेखील रोमी सम्राटाची कर आकारणी हा एक चर्चेचा विषय होता आणि प्रभू येशूला त्याविषयी प्रश्न विचारला गेला होता. (मत्तय २२:१५-२२) येशू त्याच्या शिष्यांना आणि इतर लोकांना नेहमी देवाच्या राज्याविषयी बोध करत असे. तरी लोक त्याला जे प्रश्न विचारायचे त्यापैकी अनेक प्रश्न त्यांच्या रोजच्या सामान्य जीवनाविषयी असायचे. येशूने दिलेली उत्तरे त्यांना पटली तरी ते त्याच्याबरोबर वाद घालायचे. त्याच्याच बोलण्यात काही तरी विसंगती शोधून त्याच्यावर आरोप ठेवता येईल असा ते प्रयत्न करीत राहायचे.

एकदा लोकांनी येशूला म्हटले, “गुरू, आम्ही जाणतो की, आपण खरे आहा आणि देवाचा मार्ग खरेपणानं शिकवता, आणि कोणाची पर्वा करीत नाही, कारण आपण माणसांचं बाह्यरूप पहात नाही.” आणि अशी सुरुवात केल्यावर त्यांनी प्रश्न विचारला, “म्हणून आम्हाला सांगा, आपल्याला काय वाटतं? कैसराला कर देणं योग्य आहे की नाही?” पण येशूने त्यांचा हेतू प्रामाणिक नसल्याचे ओळखून त्यांना म्हटले, “अहो, ढोंग्यांनो, माझी परीक्षा का करता? मला एक कराचं नाणं दाखवा.” आणि त्यांनी त्याला एक दिनार आणून दिला. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा आणि वरचा लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” त्यावर येशूने निर्णय दिला, “तर मग कैसराचं आहे ते कैसराला द्या, आणि देवाचं आहे ते देवाला द्या.”

कोणत्याही माणसाला एकाच वेळी अनेक भूमिका सांभाळाव्या लागतात. तो एका कुटुंबाचा सदस्य असतो, तो एका समाजात वावरतो, तो एका देशाचा नागरिक असतो. म्हणून त्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, सामाजिक नियम आणि देशाचे कायदे पाळायचे असतात. प्रभू येशूने ही आठवण करून दिली आहे की, आपण देवाची मुले आहोत आणि त्याच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याही आपण समांतरपणे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

७ जुलै – व्हेज की नॉनव्हेज

नुकताच मी एक नव्याने रिलीज झालेला मराठी चित्रपट पाहिला. त्याची नायिका ऑटोरिक्शात बसायच्या आधी रिक्शाचालकाला प्रश्न विचारत राहते की, “तुम्ही व्हेज आहात की नॉनव्हेज?” चालक जर नॉनव्हेज खाणारा निघाला तर ती त्या रिक्शात बसायला नकार देते आणि दुसरी रिक्शा शोधते. कारण तिचे प्राण्यांवर खूप प्रेम असते. “तुम्ही व्हेज की नॉनव्हेज?” हा प्रश्न फक्त काल्पनिक कथानकात नाही, तर रोजच्या व्यवहारातही पुष्कळदा विचारला जातो. उदाहरणार्थ, विमान प्रवाश्यांना भोजन सादर करण्याआधी, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसायची जागा देताना, घरी आलेल्या अनोळखी पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यापूर्वी, वगैरे.

“स्मोकिंग की नॉनस्मोकिंग?” हाही एक फरक हल्ली केला जातो. अनेक सार्वजनिक ठिकाणी आता धूम्रपान करायला मनाई आहे. काही ठिकाणी त्यासाठी एक वेगळा कोपरा राखून ठेवलेला असतो. मद्यपानाचेही तसेच झाले आहे. त्यासाठी सीमा आखल्या जात आहेत, ज्यांच्या आत दारू पिता येत नाही, पण त्यांच्या बाहेर दारू पिणे कायदेशीर आहे. साध्या चहाच्या बाबतीतही आता “साखरेचा की बिनसाखरेचा?” असा प्रश्न सामान्यपणे विचारला जातोच.

आपण काय खावे आणि काय प्यावे हे आता जणू मानवापुढचे मूलभूत प्रश्न झाले आहेत. जे आपल्याला आवडते तेच इतरांनीही खायला किंवा प्यायला पाहिजे, आणि जे आपल्याला आवडत नाही ते इतरांनी खाऊ नये किंवा पिऊ नये असा दुराग्रह केला जात आहे. त्यासाठी लोक कोणत्याही थराला जात असल्याचे आपण पाहत आहो.

माणसाचे तोंड दोन वेगळी कामे करते, एक खाण्यापिण्याचे आणि दुसरे बोलायचे. खाण्यापिण्याविषयी आपण खूप विचार करतो, काळजी करतो. आपल्या शरीरासाठी जे हानिकारक आहे ते आपण वर्ज करतो. आपल्या अन्नाद्वारे किती कॅलरीज मिळतात त्या आपण मोजतो, किती जीवनसत्त्वे मिळतात ते पाहतो.

पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दांच्या बाबतीतसुद्धा आपण तितकीच काळजी घेतली पाहिजे हे प्रभू येशूने आपल्याला सांगितलेले आहे. (मत्तय १५:१५-२०) आपण चांगला आहार निवडून आपल्याला शरीराला निरोगी ठेवू शकू. पण आपले शब्द, आपली भाषा, आपले संवाद, जर आपल्याला भ्रष्ट आणि अपवित्र करत असतील तर त्यांच्यावर मर्यादा घातल्या पहिजेत ना?

“चिंतन ३६५ दिवसांसाठी” पुन्हा उपलब्ध – किंमत २०० रुपये

डॉ. रंजन केळकर ह्यांच्या “चिंतन ३६५ दिवसांसाठी” ह्या लोकप्रिय पुस्तकाची पुनर्मुद्रित आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे. पुस्तकाची नवीन किंमत फक्त २०० रुपये आहे. आपली प्रत मागवण्यासाठी प्रकाशकांशी संपर्क साधावा.

प्रकाशक – व्हाईट लाईट पब्लिकेशन्स, १२८० सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०

ईमेल – whitelightpublications@gmail.com

मोबाईल – 9822280424

१ जुलै – जी.एस.टी.

१ जुलै २०१७ च्या मध्यरात्री जी.एस.टी. नावाचा एक नवा कर भारतात सर्वत्र लागू झाला. त्याबरोबर अनेक दशकांपासून प्रचलित असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कर रद्द झाले. त्यांच्या जागी कर आकारण्याची एक नवीन प्रणाली अंमलात आली. भारताच्या प्रगतिपथावरचे हे एक अतिमहत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल मानले गेले आहे.

बदल हा जगाचा एक अविचल नियम आहे असे म्हटले जाते. बदल झाल्याशिवाय मानवाची प्रगती होत नाही. माझ्या ७४ वर्षांच्या आयुष्यात मी किती तरी महत्त्वाचे बदल अनुभवले आणि पाहिले आहेत. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशावरची इंग्रजी राजवट संपुष्टात आली.

त्यानंतर काही वर्षातच, म्हणजे १९५६ साली, इंग्रजांनी केलेली प्रांतरचना बदलण्यात आली आणि तिच्या जागी नवीन भाषावार प्रांतरचना केली गेली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, अशी नवीन राज्ये अस्तित्वात आली.

मी लहान असताना एका रुपयाचे मूल्य आताच्या मानाने खूप मोठे होते. एका रुपयाचे १६ आणे, एका आण्याचे चार पैसे, आणि एका पैशाचे तीन पै, अशी नाणे पद्धती होती. ती तोंडी हिशोबासाठी सोयिस्कर होती पण लेखी हिशोबासाठी किचकट होती. १९५७ साली ही पद्धती बदलली गेली, आणि एका रुपयाचे १०० नवे पैसे झाले.

त्याच्या पाठोपाठ, १९५८ मध्ये वजने आणि मापे ह्यांसाठी मेट्रिक म्हणजे दशमान पद्धती अंमलात आली. आधीची रत्तल, शेर, मण, औन्स, पाउंड, गॅलन, यार्ड, फूट, ही वजनेमापे जाऊन त्यांच्याजागी, किलो, लिटर, मीटर अशी नवी प्रमाणे वापरात आली.

१९७७ साली भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र सुधारणा केली गेली. मी शाळेत असताना ११वी ची परीक्षा दिली होती. पण तिच्या जागी १०वी व १२वी अशा दोन परीक्षा आल्या. कॉलेजचे चार वर्षांचे अभ्यासक्रम तीन वर्षांचे झाले. ह्या पद्धतीला “१०+२+३” असे नाव मिळाले.

१९९८ सालापासून भारतात होणाऱ्या निवडणुकांत रबरी शिक्क्यांएवजी मतदान यंत्रे वापरात आली. मतांची मोजणी काही तासांच्या अवधीत पूर्ण व्हायला लागली.

भारताने वेळोवेळी किती तरी धाडसी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत, मूलभूत सामाजिक बदल घडवून आणले आहेत. पण आपल्याभोवतीचे सर्व जग सारखे पुढे जात आहे. आणि भारताला जगातील इतर देशांच्या बरोबरीने राहायचे असेल तर बदल अनिवार्य आहे.

कोणाताही बदल सोपा नसतो. कारण त्याचा परिणाम काय होईल हे नक्की सांगता येत नाही. पण अशा अनिश्चिततेच्या वातावरणात आपण घाबरून जाऊ नये. कारण आपली साथ देणारा परमेश्वर आहे. तो स्वतःविषयी म्हणतो, “मी परमेश्वर बदलत नाही.” (मलाखी ३:६)