१२ एप्रिल – उद्धारक

संत पौलाने करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्राचा सुपरिचित १३वा अध्याय पूर्णपणे प्रीतीविषयी आहे, त्यापुढचा १४वा अध्याय उपासनेविषयी आहे, आणि नंतरचा १५वा अध्याय मृत्यू आणि पुनरुत्थान यांविषयी आहे. त्यात संत पौल लिहितो की, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. (१ करिंथ १५:२६) तेव्हा जीवनाच्या विजयात मरण गिळले जाईल आणि आपण मरणाला हिणवू शकू की, “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” (१ करिंथ १५:५५-५६) पण संत पौलाचे हे शब्द स्वतःचे नव्हते. ते मुळात होशेय संदेष्ट्याचे आहेत की, “अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे?” (होशेय १३:१४)

आज आपण आपल्या सभोवतालच्या जगात पाहिले तर मृत्यूचा पराभव झाल्याचा किंवा होत असल्याचा कोणताही पुरावा आपल्याला दिसत नाही. उलट मृत्यू सर्वत्र त्याच्या विजयाचा तोरा मिरवत असल्याचा आपण पाहत आहोत. तरीही आजच्या ईस्टरच्या रविवारी प्रभू येशूचे हे शब्द आपल्याला आश्वस्त करतात की, “पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जरी मेला तरी जिवंत राहील, आणि जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.” (योहान ११:२५-२६)

जुन्या करारात ईयोब नावाच्या एका सामान्य देवभिरू माणसाची गोष्ट आहे, जो एक सुखवस्तू जीवन जगत असतो, पण अचानक त्याच्यावर आभाळ कोसळते.  त्याच्यावर एकामागून एक आपत्ती येते, त्याला भयानक रोग होतात. हे सर्व का होत आहे हे त्याला समजत नाही. त्याची बायको, त्याचे मित्र त्याला सल्ला देतात, टोमणे मारतात, त्यालाच दोष देतात. पण तो त्यांचे ऐकत नाही. तो एवढेच म्हणतो की, “मला तर ठाऊक आहे की, माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील.” (ईयोब १९:२५)

प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा, ख्रिस्ती धर्माचा आणि ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. संत पौल मोठ्या आवेशाने म्हणतो की, “जर ख्रिस्त उठला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.” (१ करिंथ १५:१४)

आज ईस्टरचा संदेश हाच आहे की, आपला उद्धारक जिवंत आहे आणि म्हणून आपल्यालाही त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळाले आहे.

प्रारंभी जो होता आणि शेवट नाही ज्याचा ।
जगती आता जिवंत आहे उद्धारक माझा ।। १ ।।

देवाची ही प्रीती मोठी, पुत्र जगाला दिला ।
जो कोणी विश्वास ठेवतो वाचवले त्याला ।। २ ।।

अपराधी मी परंतु येशू अपराधी गणला ।
माझे व्याधी रोग उचलुनी सोडवले मजला ।। ३ ।।

देह अर्पुनी नवीन केला करार रक्ताचा ।
देवपित्याच्या सन्निध बसला पुत्र मानवाचा ।। ४ ।।

पुन्हा प्रभूचे येणे होइल, बोलवील तो मला ।
नवे आकाश अन् नवीन पृथ्वी दाखवील तो मला ।। ५ ।।

नसेल तेथे दुःख कशाचे, ना काहीही क्लेश ।
मृत्यू नसेल तेथे, पुसेल अश्रू परमेश ।। ६ ।।

मार्ग, सत्य अन् जीवन आहे प्रभु येशू माझा ।
जगती आजही जिवंत आहे उद्धारक माझा ।। ७ ।।

(डॉ. रंजन केळकर)

2 thoughts on “१२ एप्रिल – उद्धारक

यावर आपले मत नोंदवा