२७ जुलै – जनता अदालत

“माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, हे वाक्य हल्ली आपण पुष्कळांच्या तोंडून ऐकत असतो. पण न्यायव्यवस्थेच्या बाहेरही खूप काही होत असल्याचे आपल्याला दिसते. “आम्हाला न्याय द्या” असे फलक हातात घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने आणि घोषणाबाजी करत असतात. आपल्यावर झालेल्या अन्यायावर शेवटचा उपाय म्हणून काही लोक आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. लोकांवर होत असलेला अन्याय जनतेसमोर आणण्यासाठी सभा, परिसंवाद आयोजित केले जातात.

न्यायव्यवस्थेच्या बाहेर लोक न्याय मागत आहेत एवढेच नाही, तर लोक इतरांचा न्याय करतसुद्धा आहेत. ट्विटरसारख्या माध्यमाद्वारे ज्यांना आपण कधी पाहिलेले नाही, ज्यांची आपल्याला माहिती नाही, अशांचा आपण चुटकीसरशी न्याय करून टाकू शकतो. न्यायालयांनी काय निर्णय द्यावा, किंवा त्यांनी दिलेला निकाल बरोबर की चुकीचा हे आपण कायद्याचे काहीही ज्ञान नसताना सांगू शकतो.

इतरांचा न्याय करायचा हा छंद काही नवीन नाही. त्याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रातही वाचायला मिळते. पंतय पिलात ह्या रोमी सुभेदाराच्या कचेरीत जेव्हा येशू ख्रिस्ताची न्यायालयीन चौकशी सुरू होती, तेव्हा बाहेर एक संतप्त लोकसमुदाय नारेबाजी करत होता. पिलाताने लोकांची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला की, त्याला येशूमध्ये कोणताही दोष आढळत नाही. पण ते मानायला तयार नव्हते. येशूला पिलाताने शिपायांकडून फटके मारून घेतले. येशू घायाळ झाला तरी लोक ऐकेनात. “त्याला वधस्तंभावर खिळा!” अशी एकच मागणी ते करत राहिले. बरब्बा नावाचा एक दरोडेखोर होता. लोक पिलाताला म्हणाले की, त्याने बरब्बाला सोडून द्यावे पण येशूला मरणदंड दिलाच पाहिजे. शेवटी, पिलात लोकांच्या इच्छेपुढे वाकला. दरोडेखोराला माफी मिळाली आणि देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खिळले गेले. (मत्तय २७:११-२६)

एकीकडे आपल्याला स्वतःविषयी वाटत असते की, आपल्याला व्यवस्थित न्याय मिळत नाही, आणि दुसरीकडे आपण लोकांचा तडकाफडकी न्याय करायला उत्सुक असतो. ह्यात आपण विसरतो की, भविष्यात एकदा कधी तरी आपल्याला परमेश्वराच्या परमोच्च न्यायासनापुढे उभे राहावे लागणार आहे. त्यावेळी आपण आपली बाजू कशी मांडणार ह्याचा आताच विचार केलेला बरा.

(डॉ. रंजन केळकर)

 

यावर आपले मत नोंदवा