Archive | जुलै 2015

२८ जुलै – देवाच्या कृपेची विपुलता

येशूचा शिष्य शिमोन पेत्र ह्याच्याशी संबंधित दोन घटना नव्या करारात नमूद केलेल्या आहेत.

येशू आणि शिमोन पेत्र ह्यांची अगदी पहिली भेट गनेसरेत सरोवराच्या किनार्‍याजवळ झाली होती. तेथे लोकांनी येशूभोवती गर्दी केली होती आणि त्यांच्याशी बोलता यावे म्हणून येशू एक मचव्यात चढला. तो मचवा पेत्राचा होता. पेत्र आणि त्याचे साथी बाहेर त्यांची जाळी धूत होते. नंतर येशू शिमोनाला म्हणाला, “मचवा खोल पाण्यात मागं घेऊन जा, आणि मासे धरायला तुमची जाळी सोडा.” शिमोन आधी तयार नव्हता. पण तो म्हणाला, “स्वामी, आम्ही रात्रभर दमलो, आणि काही धरलं नाही,  तरी पण आपल्या शब्दावरून मी जाळं सोडतो.” आणि त्याने तसे केले, तेव्हा माशांचा इतका मोठा घोळका त्यांनी एकत्र धरला की, ते जाळे फाटले. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसर्‍या मचव्यांत होते त्यांची त्याने मदत मागितली. दोन्ही मचवे माशांनी भरले आणि बुडू लागले. (लूक ५:१-११)

येशू आणि शिमोन पेत्र ह्यांची शेवटची भेट तिबिर्य समुद्राच्या किनार्‍याजवळ झाली. पेत्र आणि दुसरे शिष्य रात्री एका मचव्यात चढून मासे धरायचा प्रयत्न करत होते पण त्यांना काही मिळाले नव्हते. सकाळी पुनरुत्थित येशू किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे त्यांना समजले नाही. येशू त्यांना म्हणाला, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?” ते त्याला म्हणाले, “नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मचव्याच्या उजवीकडे जाळं टाका आणि तुम्हाला मिळेल.” त्यांनी तसे केले तेव्हा त्यांना मोठ्या माशांचा एक घोळका मिळाला आणि  त्यांना जाळे ओढवेना. योहानाने येशूला ओळखले आणि तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” हे ऐकल्यावर पेत्राने समुद्रात उडी टाकली आणि त्याने आणि इतरांनी मिळून ते जाळे किनार्‍यावर ओढत आणले. (योहान २१:१-११)

देव आपल्यासाठी काही करतो, आपल्याला काही देतो, तेव्हा ते देवाचे काम आहे हे कसे ओळखायचे? सोपे आहे. देव सढळ हस्ते, मुबलक, भरपूर देतो. इतके देतो की, ते आपल्याला घेता येत नाही. आपल्याला जेव्हा विपुलतेचा अनुभव येतो तेव्हा आपल्यावर देवाची कृपा झाली आहे असेच समजावे.

(डॉ. रंजन केळकर)  .

२७ जुलै – जनता अदालत

“माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, हे वाक्य हल्ली आपण पुष्कळांच्या तोंडून ऐकत असतो. पण न्यायव्यवस्थेच्या बाहेरही खूप काही होत असल्याचे आपल्याला दिसते. “आम्हाला न्याय द्या” असे फलक हातात घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने आणि घोषणाबाजी करत असतात. आपल्यावर झालेल्या अन्यायावर शेवटचा उपाय म्हणून काही लोक आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. लोकांवर होत असलेला अन्याय जनतेसमोर आणण्यासाठी सभा, परिसंवाद आयोजित केले जातात.

न्यायव्यवस्थेच्या बाहेर लोक न्याय मागत आहेत एवढेच नाही, तर लोक इतरांचा न्याय करतसुद्धा आहेत. ट्विटरसारख्या माध्यमाद्वारे ज्यांना आपण कधी पाहिलेले नाही, ज्यांची आपल्याला माहिती नाही, अशांचा आपण चुटकीसरशी न्याय करून टाकू शकतो. न्यायालयांनी काय निर्णय द्यावा, किंवा त्यांनी दिलेला निकाल बरोबर की चुकीचा हे आपण कायद्याचे काहीही ज्ञान नसताना सांगू शकतो.

इतरांचा न्याय करायचा हा छंद काही नवीन नाही. त्याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रातही वाचायला मिळते. पंतय पिलात ह्या रोमी सुभेदाराच्या कचेरीत जेव्हा येशू ख्रिस्ताची न्यायालयीन चौकशी सुरू होती, तेव्हा बाहेर एक संतप्त लोकसमुदाय नारेबाजी करत होता. पिलाताने लोकांची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला की, त्याला येशूमध्ये कोणताही दोष आढळत नाही. पण ते मानायला तयार नव्हते. येशूला पिलाताने शिपायांकडून फटके मारून घेतले. येशू घायाळ झाला तरी लोक ऐकेनात. “त्याला वधस्तंभावर खिळा!” अशी एकच मागणी ते करत राहिले. बरब्बा नावाचा एक दरोडेखोर होता. लोक पिलाताला म्हणाले की, त्याने बरब्बाला सोडून द्यावे पण येशूला मरणदंड दिलाच पाहिजे. शेवटी, पिलात लोकांच्या इच्छेपुढे वाकला. दरोडेखोराला माफी मिळाली आणि देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खिळले गेले. (मत्तय २७:११-२६)

एकीकडे आपल्याला स्वतःविषयी वाटत असते की, आपल्याला व्यवस्थित न्याय मिळत नाही, आणि दुसरीकडे आपण लोकांचा तडकाफडकी न्याय करायला उत्सुक असतो. ह्यात आपण विसरतो की, भविष्यात एकदा कधी तरी आपल्याला परमेश्वराच्या परमोच्च न्यायासनापुढे उभे राहावे लागणार आहे. त्यावेळी आपण आपली बाजू कशी मांडणार ह्याचा आताच विचार केलेला बरा.

(डॉ. रंजन केळकर)

 

१८ जुलै – फक्त प्रार्थना

कल्पना करा की, अनेक वर्षे ज्याच्याशी आपण संपर्कात नव्हतो असा आपला एक जुना मित्र अचानक आपल्याला फोन करतो. आजवर आपण समजून चाललो होतो की, तो जेथे कोठे असेल तेथे त्याचे चांगले चालले असेल. पण आता तो म्हणतो की, तो सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेला आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्याची पत्नी आजारी आहे, मुले नीट शिकत नाहीत. आणि त्यावर तो कुठल्या तरी दूरच्या देशात राहत आहे. हे सगळे ऐकून आपल्याला त्याच्यासाठी काही तरी करावेसे वाटते, पण आपला नाइलाज असतो. आपण त्याला सहजपणे सांगून मोकळे होतो, “माझी स्वतःचीच परिस्थिती काही फारशी चांगली नाही. शिवाय इतक्या दुरून मी तुझी काय मदत करणार? मी फक्त प्रार्थना करू शकतो!”

कधी कधी आपण एखाद्या अत्यवस्थ रुग्णाबरोबर असतो. हॉस्पिटलमधील डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत असतात. आपण बरेच तास चिंताग्रस्त मनस्थितीत उभे असतो. शेवटी डॉक्टर येऊन म्हणतात, “आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण पुढे काय होईल ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आता फक्त प्रार्थना करा!”

कधी कधी आपण स्वतःच एखाद्या कठिण समस्येला तोंड देत असतो. ती सोडवायचे सगळे मार्ग जणू बंद झाले आहेत असे आपल्याला भासते. कोणताच पर्याय समोर दिसत नसतो. मग आता फक्त प्रार्थना करण्यापलीकडे दुसरा उपाय राहिलेला नाही असे आपल्याला वाटू लागते.

पण “फक्त प्रार्थना” हा वाक्प्रचार चुकीचा आहे. कारण प्रार्थना हा काही अंतिम उपाय नाही की, सगळे करून थकल्यावर फक्त प्रार्थना करणे बाकी राहिले म्हणून प्रार्थना करून पहायची! प्रार्थना हे आपल्याला हाती असलेले एक मोठे शस्त्र आहे. ते तर आपण नेहमीच वापरले पाहिजे, एक नाइलाज म्हणून नाही.

अनेकदा आपल्याला वाटते की, आजवर आपण देवाची प्रार्थना केली नाही आणि आता आपल्यावर संकट ओढवले म्हणून प्रार्थना केली तर त्याला काय वाटेल? तो ती का ऐकेल? पण तसे नाही. कारण देव म्हणतो, “तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन.” (स्तोत्र ५०:१५)

(डॉ. रंजन केळकर)

८ जुलै – शब्दांचे सामर्थ्य

पवित्र शास्त्रातील नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचा १८वा अध्याय शब्दांच्या सामर्थ्याविषयी आहे. त्यात म्हटले आहे की, ज्ञानी मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आणि वाहत्या ओढ्यासारखे असतात. त्याचे बोलणे जणू स्वादिष्ट पक्वान्नासारखे वाटते. शहाणा मनुष्य इतरांचे लक्षपूर्वक ऐकतो आणि स्वतः कमी बोलतो. पण मूर्ख माणूस इतरांचे ऐकण्याआधीच आपली प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. मनात असेल ते बोलून टाकण्यात मूर्ख माणसाला संतोष वाटतो आणि त्यामुळेच त्याचा नाश होतो.

आपण स्वतः लोकांशी कसे बोलतो ह्यावर आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की, कधी कधी आपण लोकांबरोबर उगीचच वाद घालतो. त्यातून काही निष्पन्न तर होत नाही पण लोकांची मने मात्र दुखावली जातात. कधी कधी आपण बोलू नये ते बोलतो. कधी कधी एखादी गोष्ट सौजन्याने समजावून सांगण्याऐवजी ती तावातावाने ओरडून सांगतो. पुष्कळदा असेही होते की, आपल्या शाब्दिक भांडणाचा अतिरेक झाल्यावर काही बोलायलाच उरत नाही. मग आपण एकमेकांशी अबोला धरतो आणि अबोला कोणी संपवायचा हा एक निराळाच मुद्दा बनतो.

आपल्या शब्दांत सामर्थ्य आहे ह्याची जाणीव असूनही आपण कधी कधी ते सामर्थ्य वापरत नाही. आपल्या मनात चांगले विचार असले पण आपण ते मनातल्या मनातच राहू दिले तर त्यांचा काय उपयोग? किंवा आपल्याला सत्य माहीत असेल पण आपण ते कोणाला सांगायला तयार नसलो तर ते इतरांना कसे समजणार?

आपल्या तोंडून निघालेल्या शब्दांत प्रचंड सामर्थ्य असते. आणि विशेष हे की, ते सामर्थ्य आपण कसे, कुठे, कधी, कोणासाठी आणि कशासाठी वापरायचे हे सर्वस्वी आपण ठरवू शकतो. ते सामर्थ्य योग्य प्रकारे वापरायची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. पवित्र शास्त्र म्हणते तसे, मृत्यू आणि जीवन हीसुद्धा आपल्या जिभेच्या हाती आहेत. (नीतिसूत्रे १८:२१)

(डॉ. रंजन केळकर)

७ जुलै – हाकेच्या अंतरावर

“हाकेच्या अंतरावर” ह्या वाक्प्रचाराचा सामान्य अर्थ “अगदी जवळ” असा आहे. पण हाकेचे अंतर मीटरमध्ये मोजायचे झाले तर ते कठिण आहे. हाक किती मोठ्याने मारली होती, ते ठिकाण गजबजलेले होते का, ऐकणाऱ्या माणसाचे लक्ष होते का, वारा कोणत्या दिशेने वाहत होता, अशा किती तरी गोष्टींवर ते अवलंबून असते. सामान्यपणे हाकेचे अंतर जास्तीत जास्त २०० मीटर असू शकते.

आपण जेव्हा कोणाला हाक मारतो तेव्हा त्या व्यक्तीने निदान आपल्याकडे वळून बघावे एवढी आपली पहिली अपेक्षा असते. कधी कधी आपल्याला काही माहिती हवी असते म्हणून आपण कोणाला हाक मारतो. आपण अचानक संकटात सापडलो असताना आपण कोणाला हाक मारतो ते त्याने आपल्याकडे धावत येऊन आपली मदत करावी म्हणून. पण आजच्या धावपळीच्या जगात अडचणीत सापडलेल्यांची  हाक ऐकणारे लोक कमी होत चालले आहेत. कोणाला आपला स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नसतो, कोणाला वेळ नसतो, कोणाला ती कटकट नको असते.

ह्याच्या अगदी उलट, पवित्र शास्त्रात सांगितले आहे की, आपण प्रभू परमेश्वराला कधीही हाक मारली तरी तो हाकेच्या अंतरावरच असतो. आणि तो आपल्या हाकेचे उत्तर देतो. तो आपल्याला ठाऊक नाहीत अशा मोठ्या आणि गहन गोष्टी सांगतो. तो आपल्या संकटात आपल्याबरोबर राहतो, त्यातून आपल्याला मुक्त करतो. परमेश्वर इतका तत्पर आहे की, आपली हाक अर्धवट असतानाच तो उत्तर देतो! (यिर्मया ३३:३, स्तोत्र ९१:१५, यशया ६५:२४)

परमेश्वराबरोबर बोलायला आपल्याला एक लांबलचक टोल-फ्री क्रमांक फिरवायची, अनेक विकल्प निवडायची, आणि मग ऑपरेटरची प्रतीक्षा करत बसायची गरज नाही. आपण फक्त हॅलो म्हटले की, परमेश्वराचे उत्तर मिळेल, तो आपल्या मदतीला धावून येईल.

(डॉ. रंजन केळकर)