५ सप्टेंबर – काही हरकत नाही

कोलकाताच्या संत तेरेसा ह्यांनी केलेला बोधः

पुष्कळ लोकांची वागणूक तर्कविसंगत, अवाजवी, स्वयंकेंद्रित असते. असू द्या, त्यांची क्षमा करा.

तुम्ही चांगले वागलात तरी काही लोक तुम्हालाच दोष देतील. ते म्हणतील की, तुमच्या मनात काही तरी स्वार्थी हेतू असावा. हरकत नाही, तुम्ही चागले वागा.

तुम्ही यशस्वी झालात तर काही मित्र तुमचा विश्वासघात करतील, काही तुमचे शत्रू बनतील. हरकत नाही, यश मिळवायचा प्रयत्न करीत राहा.

तुम्ही खरे आणि प्रामाणिक असलात तरी काही लोक तुम्हाला फसवू शकतात. फसवू द्या, त्यांच्यामुळे तुम्ही आपला प्रामाणिकपणा सोडू नका.

तुम्ही काही गोष्टींसाठी आयुष्यभर झटला असाल. पण काही लोकांमुळे कदाचित तुमचे सगळे प्रयत्न एक रात्रीत धुळीस मिळतील. म्हणून आपले प्रयत्न थांबवू नका.

तुम्हाला मिळालेले समाधान आणि आनंद पाहून इतरांना कदाचित हेवा वाटेल. वाटू द्या, तुम्ही मात्र आनंदी राहा.

तुम्ही आज जे काही चांगले काम करीत आहा ते लवकरच लोक विसरून जातील. हरकत नाही, तुम्ही आपले चांगले काम करीत राहा.

तुम्ही कितीही धडपड केली, तरी ती सगळ्यांना कधीच पुरी पडणार नाही. तरीसुद्धा, तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे करा.

शेवटी, हे ध्यानात राहू द्या की, तुमचे खरे नाते परमेश्वराबरोबरचे आहे. तुमचे लोकांबरोबरचे नाते दुय्यम महत्त्वाचे आहे.

(prayerfoundation.org/mother_teresa_do_it_anyway ह्या संकेतस्थळावरील माहितीवर आधारित)

प्रभू येशू म्हणाला होता की, लोकांकडून तुमची जी अपेक्षा असेल त्याप्रमाणे तुम्ही आधी त्यांच्याशी वागा. (मत्तय ७:१२)

(डॉ. रंजन केळकर)

2 thoughts on “५ सप्टेंबर – काही हरकत नाही

  1. डॉ केळकर साहेब, आपला आजचा चिंतन-लेख सर्वांग सुंदर आहे असेच लेखन करण्यास आपणास ईश्वराचे सहाय्य मिळो हीच देवाजवळ प्रार्थना.

    Like

    • तुमच्या प्रार्थनेत तुम्ही माझी आठवण करावी ह्याहून अधिक मला काय हवे असणार? पण तुमचे नाव कळले तर बरे वाटेल.
      रंजन केळकर

      Like

यावर आपले मत नोंदवा