१५ फेब्रुवारी – सुदैव आणि दुर्दैव

काही संकटे लोकांवर अगदी अचानकपणे येतात. त्यांना त्यांची कसलीही पूर्वकल्पना नसते. कोणाला हृदयविकाराचा झटका येतो. राहत्या घराचे छप्पर कोसळते. भूकंप, त्सुनामी, भूस्खलन, ढगफुटी ह्यासारखी एखादी नैसर्गिक आपत्ती काही मिनिटांच्या किंवा सेकंदांच्या अवधीत मोठ्या प्रमाणावर विनाशाला आणि जीवितहानीला कारणीभूत ठरते. पण अनेकदा त्यात काही विलक्षण गोष्टीही घडतात. भूकंपानंतर काही दिवस लोटल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली एका बाईचा मृतदेह सापडतो पण तिच्या कुशीत तिचे तान्हे बालक मात्र सुखरूप असते! एखाद्या बसच्या अपघातात सगळे प्रवासी दगावतात, पण दरवाजाजवळ बसलेला एक प्रवासी बाहेर फेकला जातो आणि त्याला काही इजा होत नाही! एखाद्या रेल्वे गाडीला भीषण अपघात होतो, पण त्यातून काही थोडे लोक वाचतात कारण आधल्या दिवशी त्यांनी त्यांचे आरक्षण रद्द् केलेले असते!

मृत्यूपुढे कोणाचे काही चालत नाही असे जे म्हटले जाते, ते जर खरे असेल तर मग काही विशिष्ट व्यक्तीच त्याला अपवाद का ठरतात? ज्यांचा मृत्यू होतो त्या सर्वांचे वाईट कर्म त्यासाठी जबाबदार असते का, आणि जे जिवंत राहतात ते त्यांनी कमावलेल्या पुण्यामुळे का? ते ज्याचे-त्याचे सुदैव किंवा दुर्दैव म्हणायचे का? जे विपरीत झाले त्याला फुटके नशीब म्हणून मान्य करायचे का? ते नशीब आधीच कपाळावर किंवा हाताच्या रेषांत लिहिलेले असते का? किंवा आयुष्यातील प्रत्येक घटना देवाची इच्छा मानायची?

सुप्रसिद्ध तामिळ लेखक व विचारवंत चो रामस्वामी ह्यांनी लिहिले आहे की, तामिळ भाषेत “अदृष्टम्” असा एक मूळचा संस्कृत शब्द प्रचलित झाला आहे. जे डोळ्यांनी दिसते ते “दृष्टम्” आणि जे दिसत नाही ते “अदृष्टम्”. पण ह्या शब्दांचा अर्थ इतका मर्यादित नाही. जे झाले ते का झाले ह्याचे स्पष्टीकरण जेव्हा आपल्याला देता येत नाही, त्याचे कारण सांगता येत नाही, त्यासाठी कोणाला जबाबदार ठरवता येत नाही, तेव्हा त्याला अदृष्टम् असे म्हणून लोक त्या वादातून स्वतःला मोकळे करून घेतात.

इंग्रजीत अशा घ़टनांना “ऍक्ट ऑफ गॉड” असे म्हटले जाते. अनेक लेखी करारपत्रात, विम्याच्या पॉलिसीत, ऍक्ट ऑफ गॉड हे कलम समाविष्ट करण्याची प्रथा आहे, ज्याद्वारे वेळ आली तर लोक आपल्या कर्तव्यातून स्वतःला मुक्त करून घेऊ शकतात. जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्या आकलनाच्या बाहेरचे आहे, जे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे, त्याचे स्पष्टीकरण शेवटी परमेश्वरावरच सोपवलेले चांगले. आणि मनुष्याला अनाकलनीय असलेल्या प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यास परमेश्वर बांधलेला आहे असेही नाही.

पवित्र शास्त्रात एका दुर्घटनेचा ओझरता उल्लेख आहे, जिच्यात यरुशलेम शहरात एक बुरूज पडून त्याच्याखाली अठरा जण मरण पावले होते. येशूने त्याविषयी लोकांना एक प्रश्न विचारला की, “ते अठरा जण यरुशलेम शहरात राहणार्‍या इतर सर्व लोकांहून अधिक अपराधी झाले असे तुम्ही मानता काय? मी तुम्हाला सांगतो, ‘नाही’. पण तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्ही सगळे तसेच नष्ट व्हाल.” (लूक १३:१-५)

इंग्रजी बायबलमध्ये fate, good luck, bad luck, good fortune, misfortune, असे शब्द सापडत नाहीत. मराठी पवित्र शास्त्रात सुदैव, दुर्दैव, सौभाग्य, दुर्भाग्य, विधिलिखित, नशीब, असे किंवा अशा आशयाचे शब्द आढळत नाहीत. त्याउलट, देवाची प्रीती, देवाची कृपा, देवाची दया, असे शब्द प्रामुख्याने आढळतात. माणसाचे वाईट व्हावे अशी देवाची इच्छा कधीच असू शकत नाही. देवाची योजना माणसाच्या भल्यासाठीच असू शकते. हा केवळ तर्क किंवा बुद्धिवाद नाही. कारण देवाने स्वतः सांगितलेले आहे की, माणसांविषयीचे त्याचे संकल्प त्यांच्या हिताचे आणि भावी सुस्थितीचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. (यिर्मया २९:११)

प्रभू येशू म्हणाला होता की, लोक वाईट असोत किंवा चांगले, नीतिमान असोत किंवा अनीतिमान, देव त्या सर्वांवर आपला सूर्य उदयास आणतो, सर्वांवर पाऊस पाडतो. (मत्तय ५:४५) मग लोकांमध्ये भेदभाव न करणारा देव संकटाच्या वेळी मात्र फक्त पुण्यवान आणि भाग्यशाली लोकांनाच सोडवतो असा आपण तर्क लढवणे कितपत बरोबर आहे?

तेव्हा आपल्या आयुष्यात काही विपरीत घडले तर ती देवाची इच्छा होती, मनुष्य देवाच्या इच्छेपुढे काय करणार, असा नकारात्मक विचार मनात न आणलेला बरा. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना परमेश्वर पित्याची अशी प्रार्थना करायला शिकवले होते की, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) ही एक सकारात्मक प्रार्थना आहे. स्वर्गाचे राज्य पृथ्वीवरही प्रस्थापित व्हावे, अशी ही प्रार्थना आहे. स्वर्गात जसे देवाच्या इच्छेनुसार सर्व काही घडते तसेच पृथ्वीवरही देवाच्या इच्छेनुसार सर्व काही घडावे, अशी ही प्रार्थना आहे. देवाच्या इच्छापूर्तीत काही अडथळा येत असेल तर तो दूर व्हावा, अशी ही प्रार्थना आहे. शेवटी माणसाची इच्छा देवाच्या इच्छेशी समरूप व्हावी, अशी ही प्रार्थना आहे.

Advertisements

2 thoughts on “१५ फेब्रुवारी – सुदैव आणि दुर्दैव

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s