१४ जानेवारी – आयुष्य आणि जीवन

माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? माणसाचे पृथ्वीवरील आयुष्य संपले तरी त्याची जीवनकथा समाप्त होत नाही, अशी एक सामान्य कल्पना आहे. मात्र मृत्यूनंतरच्या जीवनाकडे पाहण्याचे विभिन्न दृष्टीकोन आहेत. माणूस पृथ्वीवर जन्माला येतो त्या क्षणापासून त्याचा मृत्यू होईपर्यंतचा कालावधी वर्षांत, दिवसांत, मिनिटांत मोजता येतो. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, माणसाचे आयुष्य सत्तर वर्षे, फार तर ऐंशी वर्षे आहे. (स्तोत्र ९०:१०) शतायुषी भव हा एक पारंपारिक आशीर्वाद आहे, आणि सहस्रचंद्रदर्शन पूर्ण केल्यावर ते समारंभपूर्वक साजरा करण्याचीही प्रथा आहे.

माणसाला खूप जगावेसे वाटते हे निर्विवाद आहे. आजवर जितके लोक जन्माला आले ते सगळे मरण पावले हे ऐतिहासिक सत्य माहित असूनही, कोणालाही मरावेसे वाटत नाही. चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा मूलभूत सिद्धान्त हा आहे की, माणूस त्याच्याभोवती असलेल्या धोक्यांना आणि प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता आपले अस्तित्व टिकवायचा आणि आपले आयुष्यमान वाढवायचा प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न फळ देत असल्याचे आपल्याला दिसत आहे. भारताला स्वातंत्र्य लाभले तेव्हा भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ४५ वर्षे होते. आज ते ६५ वर्षे आहे. कारण मध्यंतरीच्या काळात भारतीयांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्यांना शुद्ध पाणी व पौष्टिक आहार मिळत आहे. हल्लीच्या पिढीचे लोक नियमित व्यायाम करू लागले आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत. लोकसंख्येच्या अभ्यासकांचे असे मत आहे की, भारतीयांचे राहणीमान असेच सुधारत गेले तर सन २००० साली जन्मलेली मुले सन २१०० निश्चितपणे पाहतील.

हे जरी खरे असले तरी, ज्याचे मोजमाप करता येत नाही अशा अनंतकाळाच्या तुलनेत मात्र माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही, मग ते सत्तर, ऐंशी किंवा शंभर वर्षांपेक्षा जास्त असो. पवित्र शास्त्रात आयुष्याची तुलना वाफेशी केलेली आहे, जी थोडा वेळ दिसते आणि नंतर दिसेनाशी होते. (याकोब ४:१४) त्यात असेही लिहिले आहे की, जसे गवत वाळते आणि त्याचे फूल गळून पडते तसे माणसाचे वैभव आहे. (१ पेत्र १:२४) माणसाचे अस्तित्वच रानातल्या गवतासारखे आहे. त्यावरून वारा वाहिला की, ते नाहीसे होते आणि ते होते त्या ठिकाणाशी त्याचा संबंध उरत नाही. (स्तोत्र १०३:१५-१६)

प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला होता: एका धनवान मनुष्याच्या जमिनीला चांगलं पीक आलं. तेव्हा तो मनात विचार करीत म्हणाला, “मी काय करू? कारण माझं पीक साठवायला माझ्याजवळ जागा नाही. मी हे करीन की, मी माझी कोठारं पाडून मोठी बांधीन, आणि त्यांत मी माझं सर्व धान्य आणि माझा माल साठवीन. आणि माझ्या जिवाला म्हणेन, ‘हे जिवा, तुला पुष्कळ वर्षांसाठी पुष्कळ माल ठेवलेला आहे. आता विसावा घे, खा, पी आणि आनंद कर.’ पण देव त्याला म्हणाला, ‘हे निर्बुद्धी, ह्या रात्री तुझ्याजवळून तुझा जीव मागितला जाईल, मग तू जे काही साठवलं आहेस ते कोणाचं होईल?’ (लूक १२:१६-२१)

येशूच्या दाखल्याचा सारांश हा आहे की, माणूस आयुष्यात जे काही कमावतो ते खरे तर त्याच्या मालकीचे नसतेच. कारण तो ते मरणानंतर बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पण त्याहून अधिक महत्त्वाचे हे आहे की, माणसाचा स्वतःच्या आयुष्यावरसुद्धा कोणताही मालकी हक्क नाही.

माणसाचे आयुष्य खरोखर इतके छोटे आहे की, त्याने परिश्रम करून मिळवलेली संपत्ती उपभोगायलासुद्धा ते अपुरे आहे. माणसाच्या आयुष्याचे थोडेथोडके दिवस एका सावलीसारखे विरून जातात. उद्या काय होईल ह्याची त्याला कल्पनाही नसते. मग हे आयुष्य जगणे व्यर्थ आहे का? माणसाचे आयुष्य केवळ एक रिकामी खटपट आहे का? (उपदेशक १:१४, ८:१२) ह्या प्रश्नांची उत्तरे सार्वकालिक जीवनाच्या चौकटीतच शोधावी लागतील.

Advertisements

One thought on “१४ जानेवारी – आयुष्य आणि जीवन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s