९ ऑक्टोबर – आपले शब्द

कधी कधी आपण संकटात सापडतो ते आपण काही चुकीचे काम केले म्हणून नाही पण आपण काही तरी चुकीचे बोललो म्हणून. ज्यांना हल्ली सेलेब्रिटी म्हटले जाते त्यांच्या बाबतीत तर हे अधिक खरे आहे. त्यांनी एखाद्या शब्दाचा गैरवापर केला किंवा त्यांच्याकडून अपेक्षित नसलेले असे विधान त्यांनी केले, तर त्यावर सामान्य लोकांची विपरीत प्रतिक्रिया होते. त्यांच्या शब्दांचा खोलवर अर्थ शोधला जातो, त्यांवरून त्यांचा न्याय केला जातो. आता तर लोक कधी काय बोलले ह्याची नोंद व्हिडिओ आणि ऑडिओ टेपच्या माध्यमाद्वारे करून ठेवता येते आणि नंतर कधी तरी ती टेप पुराव्यादाखल पुन्हा वाजवता येते.

फक्त मोठ्या लोकांनी नाही, तर सामान्य माणसांनीही आपले शब्द जपून वापरायला हवेत. कधी कधी पती-पत्नी एकमेकांना काही तरी बोलून जातात, भांडतात, मग समेट करतात. पण ते शब्द कुठे तरी आठवणींच्या एका लहान कोपऱ्यात तसेच राहतात आणि काही काळ लोटल्यानंतर अचानक ते बाहेर येतात. मग त्या शब्दांचा अर्थ नव्याने काढला जातो, त्यांमागील हेतू शोधले जातात, शंका उपस्थित होतात, आणि दुरावा वाढतो.

जीवनातील अनेक प्रसंग आणि अनुभव हळूहळू भूतकाळात जमा होत राहतात. ते आपण विसरतो कारण त्यांची तीव्रता कमी होते आणि वर्तमानाशी त्यांचा संदर्भ राहत नाही. पण शब्दांचे तसे नाही. कोणी आपला अनादर केला असेल, आपल्यावर काही अन्याय केला असेल, आपल्याला दुखावले असेल, चिडवले असेल, तर त्यावेळचे सगळे शब्द जसेच्या तसे आपल्या स्मरणशक्तीत राहतात.

पवित्र शास्त्रात शब्दांच्या वापराविषयी चांगला बोध केलेला आहे. त्यात म्हटले आहे की, आपले बोलणे तर देवाला ऐकू जातेच, पण आपल्या मुखातून एखादा शब्द बाहेर पडण्याआधीच तो देवाला ठाऊक असतो. (स्तोत्र १३९:४) प्रभू येशूने स्वतः सांगितले आहे की, आपले येथील जीवन संपल्यावर आपल्याला आपण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा हिशोब देवाला द्यावा लागेल. चर्चेच्या नावाखाली आपण केलेली वायफळ बडबड, आपण निवडलेले रिकामे शब्द, आपण केलेली निरर्थक विधाने आपल्याच विरुद्ध देवाच्या न्यायप्रक्रियेत वापरली जातील. (मत्तय १२:३६)

बोलण्यापूर्वी विचार करा, हा पवित्र शास्त्राचा इशारा आहे. अर्थात असे करणे कठीण आहे आणि ते सोपे व्हावे म्हणून ही प्रार्थनाही त्यात दिली आहे: “हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनाचे विचार तुला मान्य असोत!” (स्तोत्र १९:१४)

(डॉ. रंजन केळकर)

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s