२० सप्टेंबर – अपेक्षा

इतरांकडून आपल्या सर्वांच्या काही ना काही अपेक्षा असतात. आईवडील त्यांच्या मुलांकडून अपेक्षा करतात, तर मुले आईवडिलांकडून. आपले मित्र, नातेवाइक, सहकारी, ह्यांच्याकडूनही आपण मनात काही अपेक्षा बाळगून असतो. आपल्या समाजाकडून, देशाकडून आपल्या काही अपेक्षा असतात. आणि देवाने तर आपल्यासाठी सर्व काही केलेच पाहिजे असे आपल्याला हक्काने वाटते. पण नेहमीच आपल्या मनासारखे होत नाही आणि मग अपेक्षाभंगातून निराशा निर्माण होते. आपल्याकरता कोणीच काही करत नाही असे वाटू लागते.

अपेक्षा ठेवणे तसे काही चुकीचे नाही. दावीद प्रार्थना करतो की, “सकाळी माझ्या विनवण्या मी देवापुढे सादर करतो आणि अपेक्षा करत वाट पहातो.” (स्तोत्र ५:३) आणि पुन्हा ही की, “हे माझ्या जिवा, देवाची वाट पाहा, कारण माझी अपेक्षा त्याच्याकडून आहे.” (स्तोत्र ६२:५) बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या शिष्यांना प्रभू येशूकडे पाठवले होते, हे विचारायला की, “जो येणार आहे तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?” (मत्तय ११:३)

पण येथे दुसरीही एक बाजू आहे. जॉन एफ. केनेडी ह्यांनी १९६१ साली अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेताना केलेल्या भाषणात म्हटले होते की,  “तुमचा देश तुमच्यासाठी काय करील हे विचारू नका, तर तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकाल हे विचारा.” भारतात आलेले आद्य इंग्रज मिशनरी डॉ. विल्यम केरी म्हणायचे, “देवाकडून महान अपेक्षा ठेवा पण त्यासोबत देवासाठी महान गोष्टी करायचा प्रयत्न करा.”

“तुझ्या आईबापाचा सन्मान कर” ही देवाची पाचवी आज्ञा होती (निर्गम २०:१२) पण त्या संबंधात संत पौलाने नंतर आईबापांनाही आठवण करून दिली की, त्यांनी त्यांच्या मुलांशी जबाबदारीने आणि प्रेमाने वागले पाहिजे. (इफिस ६:४)

आपल्यासाठी इतरांनी कायकाय केले पाहिजे ह्याचा आपण सारखा विचार करत असतो पण आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत किंवा नाही ह्याकडे मात्र आपले लक्ष नसते. कदाचित आपल्या वागणुकीमुळे इतर लोकांचा अपेक्षाभंग होत असेल हा विचार आपण करत नाही.

आपल्या मुलांकडून जर आपल्या काही अपेक्षा असू शकतात, तर देव पित्याच्या त्याच्या मुलांकडून अपेक्षा का असू नयेत? आणि त्या काही फार मोठ्या नाहीत. आपण त्याचे भय धरावे, त्याच्या मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, आणि पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण जिवाने त्याची सेवा करावी, हेच त्याला हवे आहे. (निर्गम १०:१२)

4 thoughts on “२० सप्टेंबर – अपेक्षा

  1. आपण दुसऱ्याला काय पाहिजे ते दिल तर हं त्यात काय कोणीपण देत. किंवा तुमचं काम चं आहे असं म्हणणारे पण आहेत.दिल काय आणि घेतलं काय सर्व सोडून आपण आपलं बघायचं.

    Like

यावर आपले मत नोंदवा