३० जून – ठोका आणि दार उघडेल

“मागा, आणि ते तुम्हाला दिलं जाईल; शोधा, आणि तुम्हाला सापडेल; ठोका, आणि तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल.” (मत्तय ७:७-८) असे प्रभू येशू दोन हजार वर्षांपूर्वी म्हणाला असला तरी यशस्वी जीवनासाठी प्रयत्नवाद आणि आशावाद ह्या दोन्हींची गरज आहे हे त्याचे सांगणे आजही खरे वाटते.

भिंती सुरक्षेसाठी बांधल्या जातात आणि लोकांना त्या ओलांडता येणार नाहीत अशी त्यांची रचना असते. ह्याउलट भिंतींमध्ये दरवाजे असतात ते लोकांना त्यातून सहजपणे ये-जा करता यावी म्हणून. पण दरवाजे नेहमीच उघडे असतात असे मुळीच नाही. “परवानगीशिवाय आत येऊ नये”, “ह्या दरवाजातून प्रवेश नाही”, “हे प्रवेशद्वार रात्री बंद राहील”, ह्यासारखे अनेक फलक आपण पाहतो. तरीही पुष्कळ ठिकाणी आपण आत जायची परवानगी मागितली तर ती मिळते. एखादे दार कायमचे बंद असले तर त्याच्या आसपास दुसरे एक दार उघडे असते.

बंद दार ठोकणे आपल्या हाती असते आणि आपण तसा प्रयत्न केला तर शेवटी ते उघडते ह्याचे येशूने एक उदाहरण दिले होते. एक माणूस त्याच्या मित्राकडे ऐन मध्यरात्री जातो, त्याचे दार ठोकतो आणि त्याच्याकडून काही भाकरी उसन्या मागतो. मित्राचे कुटुंब झोपलेले असते आणि तो उठून दार उघडायला तयार नसतो. पण त्या माणसाची गरज तातडीची असते आणि तो तेथेच उभा राहून दार ठोकत राहतो. शेवटी मित्र दार उघडतो आणि मैत्रीखातर नाही तर निदान त्याच्या आग्रहामुळे तरी त्याला हवे ते देतो. (लूक ११:५-८)

जो ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल, हे येशूचे वचन फक्त भौतिक जीवनासाठी नसून ते आध्यात्मिक जीवनालाही तितकेच लागू पडते. हे स्पष्ट करण्यासाठी येशूने स्वतःला एका दाराची उपमा दिली होती. तो स्वतःविषयी म्हणाला होता की, “मी दार आहे; माझ्यामधून जर कोणी आत येईल तर त्याचं तारण होईल.” (योहान १०:९)  येशूचे दार ठोकणे आणि त्यातून प्रवेश मिळवणे महत्त्वाचे आहे कारण त्याच्या पलीकडे अनंत जीवन आहे.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s