३१ मे – वाळूवरचे घर

बायबलमध्ये नमूद केलेल्या परमेश्वराच्या दहा आज्ञांपैकी दहावी आणि शेवटची आज्ञा ही आहे की, “आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची आभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको.” परमेश्वराची ही आज्ञा पाळणे किती कठीण आहे! माझ्या घरापेक्षा दुसऱ्यांची घरे मला नेहमीच सुंदर दिसतात. दुसरे लोक माझ्यापेक्षा अधिक सुखी, आनंदी, संपन्न असल्याचे मला नेहमी भासते. मग मी माझ्या घराविषयी विचार करू लागतो. कदाचित माझ्या घराचा दरवाजा थोडा मोठा असता तर त्यातून ये-जा करणे सोयीचे झाले असते, त्याशिवाय अधिक सुखसमृद्धीही घरात प्रवेश करू शकली असती. ती पूर्वेकडची खिडकी जर पश्चिमेकडे असती तर तिच्यातून शीतल वारा आला असता, आणि त्याबरोबर घरात प्रसन्नता वाहून आली असती. ती आतली खोली जर थोडी मोठी असती तर जास्त मोकळीक मिळाली असती, घरचे सगळे लोक एकोप्याने राहू शकले असते.

पण घरच्या भिंतीदरवाजांपेक्षा महत्वाचा असतो तो त्याचा पाया. येशू ख्रिस्ताने एकदा दोन माणसांविषयी सांगितले, एक शहाणा होता आणि दुसरा मूर्ख. दोघेही आपली आपली घरे बांधतात. शहाणा माणूस जमीन खोल खणून खडकावर पाया घालतो आणि त्यावर बांधकाम करतो आणि मूर्ख माणूस पाया न घालताच वाळूवर त्याचे घर बांधून टाकतो! पण पुढे असे होते की, अचानक मोठा पाऊस पडतो, वादळी वारे वाहू लागतात, पूर येतो आणि पाण्याचा लोंढा दोन्ही घरांवर आदळतो. शहाण्या माणसाने खडकावर बांधलेले घर पडत नाही. ते चांगले बांधलेले असल्यामुळे आपल्या जागी टिकून राहते. परंतु मूर्ख माणसाने वाळूवर बांधलेल्या घरावर जेव्हा पाण्याचा लोंढा आदळतो तेव्हा ते पडते आणि त्याचा नाश होतो.

हल्लीच्या काळात आपल्या आजूबाजूला सर्वत्र बांधकाम सुरू असल्याचे आपण पाहतो. उंचउंच इमारती अगदी थोड्या कालावधीत उभ्या राहतात. लोक आधीच बुकिंग करून ठेवलेल्या त्यांच्या घरात थाटामाटाने गृहप्रवेश करतात. पण आपण मात्र आपल्या स्वप्नातील घराची वाट बघत असतो जे काही बांधून होत नाही. कोणती ना कोणती अडचण येत राहते. कधी कर्ज मिळत नाही, कधी बिल्डर लक्ष घालत नाही, कधी दुसरे काही अनपेक्षित अडथळे येतात.

येशूने त्याच्या शिष्यांना शहाण्या आणि मूर्ख माणसांविषयी सांगितले तेव्हा त्यांना स्थापत्यशास्त्राचा एक धडा शिकवायचा त्याचा हेतू नव्हता. त्यावरून आपण हे समजून घ्यायचे आहे की, माणसाचे जीवन हे पटकन बांधून टाकलेल्या घरासारखे असू नये. त्याचा पाया भक्कम असला पाहिजे. त्याची रचना कशीही असो, त्यात राहणारे कुटुंब प्रेमाने राहणारे असावे. ते घर कसेही दिसो, त्यात देव नांदत असला पाहिजे. अशा घरावर कोणतीही आपत्ती आली तरी ते कोलमडून पडत नाही. बायबलमधील एका स्तोत्रात म्हटले आहे की, जर परमेश्वर घर बांधीत नसेल, तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ ठरतात. जीवन जगण्याच्या आपल्या प्रयत्नांत, जीवनात प्रगती करण्याच्या आपल्या धडपडीत, परमेश्वराला सहभागी करून घेणे लाभाचे ठरते.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s