१० मे – आत्मा आणि शरीर

एका दृष्टीने मानवी शरीर हे एखाद्या यंत्रासारखे आहे. घड्याळाप्रमाणे हृदयाचे ठोके पडताना ऐकू येतात. यंत्रासारखी शरिराची काळजी घ्यावी लागते आणि त्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागते. कोणतेही यंत्र चालवायला जशी ऊर्जा पुरवायला लागते तसेच शरिराला हवा, पाणी, अन्न ह्यांची गरज असते. जसे एखादे यंत्र एकसारखे वापरले की, त्याच्या भागांची झीज होते, तसेच शरिराच्या अवयवांची झीज होते. आता तर जसे यंत्रांचे निकामी भाग बदलता येतात तसे शरिराचे काही अवयवही बदलता येतात.

पण मानवी शरिरात आणि यंत्रात एक मोठा फरक आहे तो हा की, शरिरात देवाचा आत्मा राहतो. म्हणून आपल्या शरिरात नुसता मेंदू नाही पण मन, बुद्धी, कल्पनाशक्ती आहे. आपल्या शरिरात केवळ हृदय नाही, तर अंतःकरण, भावना आहेत. आत्मा, जीव आणि शरीर हे आपले तीन घटक आहेत. जीव आपल्याला अस्तित्व देतो, शरीर आपल्याला व्यक्तित्व देते, आणि आत्मा आपल्याला देवत्व देतो.

आत्मा, जीव आणि शरीर ह्यांच्यापैकी सर्वात जास्त काळजी आपण शरिराची घेतो. आपला चेहरा सुंदर, आकर्षक दिसावा, आपले शरीर स्वच्छ, निरोगी, सशक्त राहावे, म्हणून आपण एकसारखे प्रयत्न करत असतो. आपण व्यायाम करतो, जिममध्ये जातो, संतुलित आहार घेतो, गरजेनुसार औषधे घेतो. पण आपले शरीर हे परमेश्वराच्या आत्म्याचे मंदिर आहे, हे आपण विसरू नये. आत्म्याला ह्या मंदिरात राहणे असह्य होईल असे आपण शरिराला काही करू देऊ नये.

आपण जर आपल्याभोवती पाहिले तर असे सहज दिसून येते की, इतर लोक आपल्यापेक्षा किती तरी श्रीमंत आहेत, सुंदर आहेत, हुशार आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाही, ह्याची जाणीव आपल्याला झाल्यावाचून रहात नाही. त्यांच्या तुलनेत आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी लेखायला लागतो. मग समाजाने किंवा सरकारने आपल्याकरता काही तरी विशेष केले पाहिजे अशी अपेक्षाही आपण करू लागतो. म्हणूनच हल्लीच्या भाषेत ‘कमकुवत घटक’, ‘सशक्तीकरण’, ‘सबलीकरण’, असे नवीन शब्द प्रचलित होत चालले आहेत.

पण बायबल म्हणजे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, देवाने कोणालाही कमकुवत बनवलेले नाही, त्याने कोणाला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा,  प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीत, संकटात, क्लेशात, मोहात, देवाच्या सामर्थ्याचा आत्मा आपल्यासाठी काम करत असतो. असेही लिहिले आहे की, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सदिच्छा, विश्वास, सौम्यता, संयमन, ही सर्व आत्म्याची फळे आहेत.

पण आपल्या आचरणातून इतर लोकांना खरोखर काय दिसते? आपला स्वभाव त्यांना मनमिळाऊ वाटतो का? आपण नेहमी आनंदी असतो का? आपली वृत्ती शांत, प्रेमळ असते का? आपल्या विचारांवर आपला ताबा असतो का? आपल्याला चटकन राग येतो का? इतरांचा हेवा वाटतो का? आपण लगेच संशय घेतो का?

म्हणून आपण कसे दिसतो हे फक्त आपल्या शरीरापुरते मर्यादित नाही. जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या आत्म्याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

One thought on “१० मे – आत्मा आणि शरीर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s