३ मे – अंतरीचा देव

“प्रवेश बंद” किंवा “प्रवेश निर्बंधित” किंवा “येथून पुढे जाण्यास मनाई आहे” असे सांगणारे फलक सरकारी आणि खाजगी इमारतींच्या समोर, रस्त्यांवर, हॉस्पिटलच्या आय.सी.यू. च्या दरवाजांवर, किती तरी ठिकाणी असतात. नवल म्हणजे जेथे देवाची उपासना होते तेथेसुद्धा कधी कधी “प्रवेश बंद” ची पाटी पहायला मिळते. कुठे विधर्मियांना मज्जाव असतो, तर कुठे फक्त पुरुषांना आत जायची परवानगी असते, स्त्रियांना नाही. असे प्रतिबंध आजच्या युगात विसंगत वाटत असले तरी परंपरेच्या नावाखाली ते लावले जातात. देवाचे दर्शन घ्यायचा सर्वांना हक्क नाही का आणि त्या हक्कावर कोणी मर्यादा घालू शकतात का ह्याविषयी हल्ली खूप चर्चा सुरू आहे आणि आंदोलने पण होत आहेत.

पण देवाचे खरे मंदिर कोणते? जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते? जेथे अधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते? किंवा आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा? जेथे आरती म्हटली जाते? किंवा जेथे काल्पनिक चित्रांच्या समोर मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि विनवण्या सादर केल्या जातात?

देवाचे घर कोणते किंवा तो कुठे राहतो? त्याची भेट घेण्यासाठी डोंगर चढून जायचे की दूरदूर चालायचे?  परदेशी जायचे की नदीत स्नान करायचे? शेवटी देवाचा शोध हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रयत्न आहे, आणि जो कोणी देवाला खरेपणाने शोधतो त्याला तो नक्कीच सापडतो.

पण देव शेवटी कुठे सापडतो? “शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी”, हे महम्मद रफी ह्यांनी मालकंस रागात गाइलेले एक खूप जुने गीत आहे. कवयित्री वंदना विटणकर ह्यांनी त्यात पुढे अनेक प्रश्न विचारले आहेत, “भेटतो देव का पूजनी, अर्चनी? पुण्य का लाभते दानधर्मांतुनी? शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी?”

ह्याच आशयाचे ग. दि. माडगूळकर ह्यांनी लिहिलेले आणि सुधीक फडके ह्यांनी म्हटलेले आणखी एक गीत आहे. “देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे, तुझ्या माझ्या जड देही देव भरूनिया राही.”

पवित्र शास्त्रात म्हणजे बायबलमध्ये हे अगदी स्पष्ट लिहिले आहे की, ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही आणि त्याला तशा मंदिराची गरज नाही. परमेश्वराचे खरे मंदिर तर आपणच आहोत कारण त्याचा आत्मा आपल्यात राहतो. पवित्र शास्त्रात हेही सांगितले आहे की, देवाजवळ कोणत्याही प्रकारचा पक्षपात नाही. देव त्याच्या मुलांमध्ये वाईट आणि चांगले, नीतिमान आणि अनीतिमान, पुरुष आणि स्त्री, असा कोणताच भेदभाव करत नाही.

भव्य उपासनामंदिरांच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे, जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हायला हवी. पण त्याआधी आपल्या अंतःकरणावर आपण काय लिहिले आहे तेही आपण बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंतःकरणावरची “प्रवेश बंद” ची पाटी वाचून परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.

(डॉ. रंजन केळकर)

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s