१६ मार्च – घटाघटांचे रूप आगळे

“प्रपंच” नावाच्या १९६१ सालच्या चित्रपटात कविवर्य ग. दि. माडगूळकर ह्यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके ह्यांनी गाइलेले एक सुंदर गीत आहे. “फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार … माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार … घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार, तू वेडा कुंभार…” माडगूळकरांचे आध्यात्मिक विचार सर्वांना पटतीलच असे नाही, पण त्यांचे वैज्ञानिक निरीक्षण मात्र अचूक आहे हे मान्य करावे लागेल.

आभाळाकडे पाहिले तर कोणतेही दोन ढग सारखे दिसत नाहीत. एक अगदी लहान तर दुसरा खूप मोठा. एक कापसाच्या ढिगासारखा तर दुसरा पांढऱ्या चादरीसारखा. काही ढग शांतपणे रांगेत उभे राहणारे, तर काही घाईने धावणारे. काही ढगांतून पाऊस पडतो, काही तसेच निघून जातात. पण फक्त ढगच नाही, आकाशातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट निरनिराळ्या रूपात दिसते. छोट्या झऱ्यापासून महानदीपर्यंत पाण्याचा प्रत्येक प्रवाह निराळा असतो. झाडांचे प्रत्येक पान आणि फळ किंचितसे वेगळे असते. पृथ्वीवरचे डोंगर बघा, त्यात काही छोट्या टेकड्या तर काही हिमालयासारखी उत्तुंग शिखरे. समुद्रात कोट्यावधी प्रकारचे मासे, जीव-जंतू, वनस्पती राहतात ज्यांना आपण कधी पाहिलेलेही नाही. सूर्यमालिकेतील प्रत्येक ग्रहाचे रूप, रंग, आकार, त्यावरील दिवस-रात्र, वातावरण, सर्व काही निराळे आहे. आकाशातले तारे मोजायचा कोणी प्रयत्न केला तर तो फोल ठरेल इतके ते अगणित आहेत.

निसर्गात दिसणारी प्रत्येक वस्तू निराळी, अप्रतीम, अद्वितीय आहे कारण विश्वातील एक-एक गोष्ट परमेश्वराची हस्तकृती आहे. परमेश्वर उत्पादक नाही, निर्माता आहे. आणि म्हणून तो त्याच्या प्रत्येक निर्मितीला व्यक्तिशः ओळखतो, मग तो आकाशातला तारा असो किंवा पृथ्वीवरचा मानव असो. बायबलमध्ये म्हणजे पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, परमेश्वराने प्रत्येक ताऱ्याचे नाव आपल्या तळहातावर लिहून ठेवले आहे आणि तो त्यांची हजेरी घेतो! प्रत्येक माणसाच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले असतात!

अतिसुरक्षित स्थळी प्रवेश मिळवण्यासाठी हल्ली बोटांच्या ठशांचा वापर केला जात आहे. आपले कम्प्यूटर किंवा मोबाईल फक्त आपल्यालाच वापरता यावेत ह्यासाठीही अशी व्यवस्था उपलब्ध होत आहे. ह्यामागचे तंत्रज्ञान हे आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे अद्वितीय असतात. काही लोकांचे चेहरे कदाचित सारखे दिसतील पण जगातील कोट्यवधी लोकांत कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे कधीच सारखे असणार नाहीत.

परमेश्वराने मानवाची निर्मिती केली ती मातीपासून, एखाद्या कुंभाराने मातीपासून भांडे घडवावे तसे. आणि कुंभाराने बनवलेले प्रत्येक भांडे थोडेफार निराळे असते. पुष्कळदा मला परमेश्वराला विचारावेसे वाटते की, “मी जसा आहे तसा मी का आहे? तू मला आणखी सुंदर, रुबाबदार, बुद्धिमान, सशक्त, कुशल का नाही बनवलंस?” तेव्हा परमेश्वर मला म्हणतो, “बाळ, तू आहेस तसाच मला आवडतोस. तू कसाही असलास तरी माझा लाडका आहेस. पण जरा धीर धर. मी तुला एक नवीन, सुंदर, पवित्र, अविनाशी, शाश्वत शरीर देणार आहे. पण ते लगेच नाही. तू जेव्हा माझ्याकडे परत येशील तेव्हा.”

(डॉ. रंजन केळकर)

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s