९ मार्च – विश्वास आणि श्रद्धा

विश्वास आणि श्रद्धा हे शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यांच्यात पुष्कळ फरक आहे. आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासावर खूप जोर दिला जातो. आपल्यात आत्मविश्वास नसला तर, कसोटीच्या वेळी आपल्याला भीती वाटते, आपला रक्तदाब वाढतो, आपल्यावर टेन्शन येते. पण प्रयत्न करून आपण आपला आत्मविश्वास वाढवू शकतो आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण खूप काही साध्य करू शकतो. आपल्यात आत्मश्रद्धा असावी असे मात्र कोणी बोलत नाहीत कारण ती असूच शकत नाही. श्रद्धेत निष्ठेचा अंश असतो आणि कोणी स्वतःवर निष्ठा ठेवू शकत नाही. ज्या व्यक्तीवर आपली श्रद्धा असते ती व्यक्ती आपल्याला पूजनीय वाटते, आणि कोणी स्वतःची पूजा करू शकत नाही.

विश्वासात खात्री असते. कारण आपण विश्वास ठेवावा म्हणून कोणी तरी हमी द्यायला तयार असतो. एखादी महाग वस्तू आपण विकत घ्यावी म्हणून विक्रेता आपल्याला हमी देतो की, ती खराब निघाली तर तो आपले पैसे परत करील, किंवा तिचा उत्पादक हमी देतो की, ती तो बदलून देईल. पण श्रद्धेत देवाबरोबर किंवा देवासमान मानल्या जाणाऱ्या व्यक्तीबरोबर देवाणघेवाण चालते. मी देवाला प्रसन्न ठेवले तर माझ्यावर त्याची कृपादृष्टी राहील ही माझी अपेक्षा असते. मी नवस केला आणि माझी इच्छा खरोखरच पूर्ण झाली, तर मला तो नवस फेडावा लागतो, किंवा आधी व्रत पाळून नंतर इच्छा पूर्ण व्हायची मला वाट पहावी लागते. आणि माझ्या मनासारखे झाले नाही, तर मला दुसऱ्या कोणावर श्रद्धा ठेवायची मोकळीक असते. श्रद्धेच्या अशा प्रकारच्या व्यापारीकरणात अंधश्रद्धेची निर्मिती सहजपणे होते.

आजच्या वैज्ञानिक युगात अंधश्रद्धेला स्थान नाही हे निर्विवाद आहे. पण अंधळी श्रद्धा आणि डोळस श्रद्धा ह्यांच्यामधील सीमारेषा नेमकी कुठे आखायची हे निश्चित करणे अवघड आहे. फक्त ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात किंवा ज्या अदृश्य प्रक्रियांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येते त्यांच्यावरच श्रद्धा ठेवायची का? आणि जर असे ठरवले तर मग त्या गोष्टींवर किंवा प्रक्रियांवर श्रद्धा ठेवायची गरजच कुठे उरते?

म्हणून मुळात अंधश्रद्धेची आणि ओघाने डोळस श्रद्धेची व्याख्या करणे महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी भौतिक विज्ञानाच्या विचारसरणीत बसत नाहीत किंवा पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या जुन्या परंपरा आजच्या जीवनाशी विसंगत वाटतात त्या सर्वांना अंधश्रद्धेच्या चोकटीत बसवायचे का ह्यावर चर्चा झाली पाहिजे. धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये केला जाणारा भेदभाव, त्यांच्यावर होत असलेले अत्याचार, भोंदूगिरीमुळे लोकांची होत असलेली फसवणूक, हे सगळे बंद होणे अगत्याचे आहे. पण अंधश्रद्धेचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी सगळ्याच प्रकारच्या श्रद्धेचे समूळ उच्चाटन करावे लागणार आहे का हा प्रश्न राहतो.

शेवटी हे म्हणावे लागेल की, श्रद्धा निराळी आणि विश्वास निराळा. पवित्र शास्त्रात म्हणजे बायबलमध्ये विश्वासाची एक व्याख्या आढळते. ती अशी की, विश्वास ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्यांची ग्वाही देतो. आणि विश्वास ज्या गोष्टींची आपल्याला आशा आहे त्यांची हमी देतो. ज्यांचे जीवन अशा विश्वासावर आधारलेले असते त्यांना भूतकाळाचा खेद नसतो, भविष्याची खंत नसते आणि वर्तमान परिस्थितीत त्यांना असुरक्षित वाटत नाही.

(डॉ. रंजन केळकर)

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s