Archive | जानेवारी 4, 2016

४ जानेवारी – नवीन मनुष्य

संत पौलाने बोध केला आहे की, “तुम्ही आपल्या मागील आचरणाशी संबंध असलेला जुना मनुष्य काढून टाका, आणि आपल्या मनाच्या आत्म्यात नवे व्हा. आणि नीतिमत्वात व खर्‍या पावित्र्यात देवाशी समरूप असा निर्माण केलेला नवा मनुष्य परिधान करा.” (इफिस ४:२२-२४)

नवा मनुष्य परिधान करणे म्हणजे नेमके काय ह्याचे स्पष्टीकरणही पौलाने दिले आहे. तो म्हणतो, “तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतींसहित काढून टाकला आहे व नवा परिधान केला आहे; आणि त्याला निर्माण करणार्‍याच्या प्रतिरूपानुसार तो ज्ञानात नवा केला जात आहे. येथे हेल्लेणी किंवा यहुदी नाही, सुनत झालेले किंवा बेसुनत, बर्बर किंवा स्कुथी, दास किंवा स्वतंत्र नाही, परंतु ख्रिस्त सर्व आहे व सर्वांत आहे.

“तर मग, देवाचे निवडलेले, पवित्र आणि प्रिय म्हणून, तुम्ही उपकार करणारा कळवळा, ममता व मनाची लीनता, सौम्यता व सहनशीलता परिधान करा. एकमेकांचे सहन करा; आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. आणि ह्या सर्वांवर प्रीती परिधान करा; ती पूर्ण करणारे बंधन आहे. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात निर्णय करो. तिच्यासाठी एका शरिरात तुम्ही बोलावले गेला आहात; आणि तुम्ही कृतज्ञ व्हा.

“ख्रिस्ताचे वचन तुमच्यात संपन्नतेने राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; स्तोत्रे, भजने व आत्मिक गीते गाऊन, अंतःकरणात स्तुती करून, देवाला गा.

“आणि शब्दाने किंवा कृतीने कराल ते सर्व काही प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देवपित्याचे उपकार माना.” (कलसै ३:९-१७)

(डॉ. रंजन केळकर)