१० डिसेंबर – भविष्यकाळाची भीती

सध्या पॅरिस शहरात एक फार महत्वाची आणि मोठी बैठक सुरू आहे ज्यात जगातील सर्व देशांचे नेते, अधिकारी, शास्त्रज्ञ, विचारवंत एकत्र येऊन भविष्यकाळाच्या हवामानावर चर्चा करीत आहेत. हवामान बदलामुळे मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि हा धोका दूर करणे अपरिहार्य आहे असे त्यांना वाटत आहे.

भविष्य जगाचे असो, मानवजातीचे असो किंवा वैयक्तिक असो, सर्वांच्या मनात भविष्यकाळाविषयी उत्सुकता, चिंता आणि काही प्रमाणात भीती नेहमीच असते. वैयक्तिक स्तरावर भविष्यकाळ धोकादायक असल्याची जाणीव लोकांना सतत होत असते. मग त्यासाठी ते पैशाची चांगली गुंतवणूक कशी आणि कुठे करता येईल हे शोधत राहतात. काही सोने खरेदी करत राहतात. इतर काही लोक आपले आरोग्य उत्तम राहावे म्हणून शरीराची सर्वतोपरी काळजी घेतात. तरी समाधान मिळतेच असे नाही.

आपण जन्माला आलो त्यावेळी सूर्याच्या ग्रहांची जी परिस्थिती होती तिच्यात आपले भविष्य दडलेले आहे असे पुष्कळ लोक मानतात. आपल्या हस्तरेखांमधून आपला भविष्यकाळ दिसतो असेही काही लोक मानतात. आपल्या घरातील वस्तू इकडून तिकडे हलवून किंवा भिंतींचा रंग बदलून आपले भविष्य बदलायचा प्रयत्न लोक करतात. तरीसुद्धा भविष्यकाळाची शंभर टक्के खातरी वाटत नाही.

पवित्र शास्त्रात भविष्यकाळाविषयी तीन महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. एक तर, भविष्यकाळात काय होईल, त्यात कोणासाठी काय असेल, हे कोणालाही माहीत नाही. (उपदेशक ७:१४, ८:७) दुसरे हे की, सर्व लोकांना चांगले भविष्य लाभावे ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी त्याने प्रत्येकासाठी आधीच योजना आखून ठेवलेली आहे. (यिर्मया २९:११) तिसरे हे की, परमेश्वर पिता त्याच्या मुलांच्या सर्व गरजा जाणतो आणि पुरवतो, आणि म्हणून आपण भविष्याची व्यर्थ काळजी करू नये. (मत्तय ६:३१-३४)

जर देव आपले भविष्य घडवायला तयार आहे, तर त्याची इच्छा काय आहे हे समजून घेणे आणि त्याचे साहाय्य आणि मार्गदर्शन मागणे, हा भविष्याकडे नेणारा भरवशाचा मार्ग आहे.

(डॉ. रंजन केळकर)

यावर आपले मत नोंदवा