२७ नोव्हेंबर – अज्ञात व्यक्ती

प्रभू येशूने लोकांना कधी त्याच्या तत्त्वज्ञानाचे धडे शिकवले नाहीत. तो लोकांना छोटे दाखले सांगून अगदी कठीण विचार त्यांच्यापुढे सोपे करून मांडत असे. येशूचे हे दाखले गोष्टीच्या रूपात असले तरी रोजच्या जीवनातील प्रसंग लोकांपुढे उभे करून जीवनाकडे पहायचा एक नवीन दृष्टिकोण तो सादर करत असे. पण येशूने सांगितलेल्या कथांमधील पात्रांना त्यांने कधी नावे दिली नाहीत. दूरदेशी निघालेला मनुष्य, धनी आणि दास, बाप आणि मुलगा, पाच शहाण्या आणि पाच मूर्ख मुली, एक मेंढपाळ, हरवलेले नाणे शोधणारी बाई, अशा विविध प्रकारे येशू त्यांचे वर्णन फक्त करायचा.

त्याचप्रमाणे, प्रभू येशूने ज्या व्यक्तींची पीडा दूर करण्यासाठी वेगवेगळे चमत्कार केले, त्या व्यक्तींची नावे, लाजारस किंवा बर्तलमय असे काही अपवाद वगळता, चारही शुभवर्तमानांत लिहिलेली नाहीत. जन्मापासून असलेला एक अंधळा, दहा कुष्ठरोगी, एक हात वाळलेला माणूस, बारा वर्षे आजारी असलेली स्त्री, असे त्यांचे वर्णन केले गेले आहे एवढेच.

प्रभू येशूने दाखले सांगताना त्यांतील लोकांची नावे का सांगितली नाहीत? चारही शुभवर्तमानकारांनी येशूने केलेल्या चमत्कारांचा वृत्तान्त लिहिताना ज्या लोकांना त्याने बरे केले, त्यांची नावे का लिहिली नाहीत?

ह्यामागचे एक कारण हे असावे की, पवित्र शास्त्रातील कथानके ही काही विशिष्ट व्यक्तींपुरती मर्यादित नाहीत. येशूचे शब्द काही थोडक्या लोकांनाच लागू होतात असे नाही. येशूने काही निवडक लोकांसाठीच चमत्कार केले असे नाही.

शुभवर्तमानांतील ह्या अनेक व्यक्ती अज्ञात राहिल्या असल्या तरी आजसुद्धा त्या आपल्या विचारांना आणि कल्पनाशक्तीला चालना देऊ शकतात. आपण ह्यांतील एखाद्या कथानकांत आपले स्वतःचे नाव घातले तर ते आपल्याला ओळखीचे किंवा खरे वाटेल का? आपण शहाणपणाने न वागता कधी मूर्ख माणसासारखे अधिक वागतो का? आपण केवळ संपत्ती मिळवायच्या मागे लागलो आहोत का? देवाने आपल्यासाठी जे केले ते आपण लगेच विसरतो का?

त्या अनेक अज्ञात व्यक्ती आपणच आहोत असे मनात आल्यावाचून राहत नाही. कारण खरे तर आजसुद्धा येशू आपल्याशी बोलत आहे, आपल्याला आरोग्य देत आहे, आपल्यासाठी चमत्कार करत आहे, आपल्याविषयी सांगत आहे.

प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याची कृपा, शांती, आशीर्वाद, सांत्वन, आजसुद्धा स्वतः अनुभवता येतात.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s