१८ ऑक्टोबर – निर्मल हृदय

डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांचा जन्म रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला आणि मुत्यू शिलॉंग येथे २७ जुलै २०१५ रोजी झाला. ते २००२ ते २००७ ह्या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित केले होते “मिसाइल मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलाम ह्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केरळ राज्यातील थुंबा गावच्या एका चर्चमध्ये केली होती.

१९६३ च्या सुमारास डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपला अंतरिक्ष संशोधन कार्यक्रम हाती घेतला होता. त्यासाठी थुंबा गावचा परिसर निवडला गेला. रोहिणी नावाची छोटी रॉकेट्स बनवायचे आणि त्यांचे प्रक्षेपण करण्याचे काम अब्दुल कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवले गेले. पण हे काम सुरू करण्यासाठी थुंबा गावी कसलीही सोय नव्हती. तेथे होते फक्त एक चर्च.

थुंबाचे बहुतेक रहिवासी कोळी होते पण त्या सामान्य लोकांनी भारतीय अंतरिक्ष संशोधनाचे महत्त्व ओळखले आणि त्यांनी त्यांचे सेन्ट मेरी मॅग्डलीन चर्च त्या कामासाठी दिले. त्यात अब्दुल कलामनी त्यांची प्रयोगशाळा उभारली आणि रोहिणी रॉकेट बनवण्याचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. त्यानंतरच्या काळात तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई स्पेस सेन्टर ही मोठी संस्था उभारली गेली, जेथे आज पाच हजार कर्मचारी चंद्रयान आणि मंगलयान सारखे महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवत आहेत.

पण अजूनही सेन्ट मेरी मॅग्डलीन चर्च होते तेथे आहे. काही वर्षांपूर्वी ते चर्च आतून पहायची संधी मला लाभली होती. आता तेथे एक म्यूझियम आहे ज्यात भारतीय अंतरिक्ष संशोधनाची सुरुवात कशी झाली ह्याचा इतिहास पहायला मिळतो. विशेष म्हणजे चर्चची वास्तू जशी होती तशीच ती अजूनसुद्धा राखलेली आहे. चर्चमध्ये प्रवेश केल्यावर आजदेखील एका पवित्र वातावरणाचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

भारतरत्न ह्या भारताच्या सर्वाच्च पुरस्काराच्या आणखी एक मानकरी मदर तेरेसा ह्यांची ह्या संदर्भात आठवण होते. १९५२ साली मदर तेरेसा ह्यांनी कलकत्ता शहरात त्यांचे सेवाकार्य सुरू केले तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे जागा नव्हती. पण तेथे कालीमातेचे एक मंदिर होते जे स्थानिक लोकांनी त्यांना दिले. तेथे मदर तेरेसा ह्यांनी आपले मिशनरी कार्य सुरू केले आणि त्या जागेला नाव दिले, “निर्मल हृदय”.

आपण चांगली कामे कुठेही करू शकतो. आपण सर्व देवाची मुले आहोत. जेथे आपण राहतो तेथे देव आपल्याबरोबर असतो. देवाचे खरे मंदिर तर आपले अंतःकरण आहे. (१ करिंथ ६:१९)

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

One thought on “१८ ऑक्टोबर – निर्मल हृदय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s